श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी ७०० दिंड्या दाखल

Foto
▶ सात लाख वारकरी, भाविक पैठण नगरीत दर्शनासाठी

भानुदास, एकनाथच्या जयघोषाने शहर दुमदुमले

रमेश लिंबोरे

पैठण शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कान्याकोफ्यातून ७०० दिंड्याद्वारे जवळपास सात लाख वारकरी भाविक हातात भगवे झेंडे घेऊन टाळ मृदुंग वाजवत नाथांचा जयघोष करत नाथनगरीत दाखल झाले असून संपूर्ण नाथनगरी भानुदास एकनाथच्या जय घोषाने दुमदुमून गेली. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

आज नाथषाठी असल्याने सकाळी चार वाजेपासून वारकरी भाविकांनी गोदावरी नदीत पवित्र स्नान करून नाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या आहेत. शहरात ठिकठिकाणी पालखीवाले रिंगण करून नाथांचा जयघोष करत आहेत नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अशा जय घोषाने पैठण शहर दुमदु‌मून गेले आहे. शहरात दाखल झालेल्या सर्व पालख्या, दिंड्या गावातील नाथ मंदिरात नगर प्रदर्शना करून नाथांचे व विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपापल्या फडाकडे रवाना झाल्या आहेत. 

दरम्यान नाथषष्ठी यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेल्या दिंड्यांचे स्वागत आमदार विलास भुमरे यांनी केले. याप्रसंगी नगराध्यक्ष विद्या भूषण कावसनकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, उपमुख्याधिकारी सोमनाथ गर्जे, विलास बोंबले यांची उपस्थिती होती. आज नाथ षष्ठी असल्याने आमदार विलास भुमरे यांनी नाथ मंदिरात जाऊन नाथ समाधीचे सपत्नीत दर्शन घेतले.

यावेळी त्यांचा रघुनाथ महाराज पालखी वाले यांनी सत्कार केला. दरम्यान नाथषष्ठी यात्रेसाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असून वारकरी भाविकांना पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भाविकांनी स्वच्छता राखावी अशी आवाहन मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी केले आहे.